मंत्री धनंजय मुंडेंविरुद्ध षडयंत्र कोण रचतय?
धनंजय देशमुखांनी खोटी याचिका दाखल करणाऱ्या वकिलाची काढली खरडपट्टी; व्हिडिओ व्हायरल
बीड (प्रतिनिधी): मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने सुन्न झालेल्या महाराष्ट्रात हत्येच्या प्रकरणावर राजकारण करणारी जमात वेगवेगळ्या घडामोडीतून उघडी पडत आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची खोटी स्वाक्षरी करून त्यांना न विचारता याचिका दाखल करण्यात आली. याची माहिती धनंजय देशमुख यांना झाल्यानंतर त्यांनी संबंधित वकिलाची चांगलीच खरडपट्टी काढली. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून या चुकीच्या प्रकाराबद्दल संबंधित वकिलाने धनंजय देशमुख यांची माफी देखील मागितल्याचे त्यात स्पष्ट होत आहे. यावरूनच ना. धनंजय मुंडेंविरोधात कोणीतरी षडयंत्र रचतय हे या याचिकेतून स्पष्ट होते.
गेल्या आठवडाभरापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये एका याचिकेद्वारे धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्याबाबत व अन्य विषयांबाबत मागणी करण्यात आली होती. सदरची याचिका पिडित धनंजय देशमुख यांना न विचारता आणि त्यांची खोटी स्वाक्षरी करून दाखल करण्यात आली होती, हे आता उघड झाले आहे. याचिका दाखल झाल्याची माहिती धनंजय देशमुख यांना झाल्यानंतर त्यांनी संबंधित वकिलाला याबाबत फोन करून जाब विचारला. मला न विचारता आणि माझी खोटी स्वाक्षरी करून तुम्ही याचिका कशी काय दाखल केली? हा सवाल विचारत वकिलाला चांगलेच खडसावले. संबंधित वकिलाने अॅडजेस्ट करण्यासाठी मी हे केले, असे उत्तर दिले.
त्यावर चुकीच कशामुळे केलं? डुप्लिकेट कशामुळे केले ? ज्या वेळेस याचिका दाखल करायची त्या वेळेस मला माहिती द्यायला पाहिजे होती, याचिका मला वाचून दाखवायला होती, तुम्ही चुकीच्या पद्धतीने असे करण्यामागचं तुमचा हेतू काय ? तुम्ही डुप्लीकेट सह्या करून मला फसवलं, यासह अन्य बाबी सांगत धनंजय देशमुख यांनी खोटी याचिका दाखल करणाऱ्या वकिलाची चांगलीच खरडपट्टी केली. संबंधित वकिलाने धनंजय मुंडेंविरोधात खोटी याचिका दाखल करण्यामागचा हेतू काय? या सर्व गोष्टींमधून धनंजय मुंडेंविरोधात मोठं षडयंत्र रचलं जात असल्याचे आता यातून उघड होत आहे. धनंजय देशमुख यांनी वकिलासोबत केलेला मोबाईलवरचा संवाद एका व्हिडिओद्वारे सध्या चांगला व्हायरल होत असून त्यातून धनंजय मुंडेंच्या विरोधातला षडयंत्र आता समोर येत आहे.