बीड प्रतिनिधी l
अध्यात्म, विज्ञान यांची सांगड घालत सामाजिक परखड वास्तवाचे संदेश देणाऱ्या वैविद्यपूर्ण अभिनयसंपन्न सादरीकरणाने चिमुकल्यांनी उपस्थित सर्वांनाच निशब्द केले. अतिशय बहारदारपणे संपन्न झालेल्या उक्कडपिंपरी येथील डॉ. नारायणराव ढाकणे गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेने ग्रामीण विद्यार्थ्यांची प्रतिभा पाहून उपस्थित पाहुणेही थक्क झाले.
गेवराई तालुक्यातील उक्कडपिंपरी येथील सावित्रीबाई फुले महिला शिक्षण प्रसारक मंडळाच्या कर्मयोगी डॉ. नारायणराव ढाकणे गुरुकुल इंग्लिश स्कूल येथे दिनांक 20 डिसेंबर रोजी फॅन्सी ड्रेस स्पर्धा पार पडल्या. यावेळी प्रमुख पाहुणे शाळेचे पालक प्रकाश अलगुडे व सुनीता गर्जे, संस्थेच्या अध्यक्षा डॉ. विनिता ढाकणे, कार्यकारी संचालक अखिलेश ढाकणे, गुरुकुल पब्लिक स्कूलच्या प्राचार्य ऋतुजा गाडीवान, प्राचार्य जालिंदर नागरगोजे, प्राचार्या अपर्णा क्षीरसागर, निशांत घुले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. स्पर्धेत प्री प्रायमरी विभाग ते इयत्ता सहावी पर्यंतच्या एकूण शंभर पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी व पालकांनी यात सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची सुरुवात लहान गटातील मुलांच्या सर्जनशील सादरीकरणाने झाली.विज्ञान आणि अद्यात्म यांची सांगड घालत काही सादरीकरण लक्षवेधी ठरले. यात डिजिटल इंडिया पासून ते थोर समाजसुधारक व वास्तव दर्शवणारे अनेक सादरीकरण विद्यार्थी मित्रानी व पालकांनी एकत्रितपणे सादर करून उपस्थित पालकांची दाद मिळवली. यात मजूर, कामगाराचे वास्तव दाखणारा संवाद लक्षवेधी ठरला. सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, नेत्रदान, चंद्रशेखर आझाद, माँ.जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज आदी व जनजागृतीचा संदेश देणाऱ्या संवाद अभिनयामुळे सर्वांनाच काही काळ निशब्द केले. स्पर्धेनंतर लगेच यशस्वी स्पर्धेकांना बक्षीस वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण प्राचार्या अपर्णा क्षीरसागर व सहशिक्षक सी. व्ही. जोशी,कलाशिक्षिका धनश्री बेहरे, जोशी स्मिता यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह शिक्षक आयाज शेख, खिजर शेख यांनी केले. आभार प्रदर्शन बुशरा मॅडम यांनी मानले. यावेळी पालक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता.