गेवराई- प्रतिनिधी। गेवराई विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला सुटल्यानंतर येथून इच्छुक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या किसान आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पूजा अशोक मोरे यादेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
सोमवारी सकाळी 9 वाजता पूजा मोरे यांनी आपल्या कार्यालयात कार्यकर्त्यांची संवाद बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत त्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार असून त्यांनी आता अपक्ष लढण्याची तयारी सुरू केल्याचे म्हटले जात आहे.
पूजा मोरे या चळवळीतून पुढे आलेले नेतृत्व असून त्यांनी यापूर्वी मराठा क्रांती मोर्चा, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आता शरदचंद्र पवार यांच्यासोबत काम करीत आहेत. शरद पवार यांच्याकडे गेवराई मध्ये जेव्हा एकही कार्यकर्ता नव्हता त्यावेळी पूजाताई मोरे यांनी धाडसाने निर्णय घेत शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करीत पवारांचे विचार आणि त्यांची नवी निशाणी तुतारी हे तळागाळात नेऊन पोहोचविण्याचे काम केले.
मात्र आता ही जागा महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे गटाला सुटल्यानंतर त्यांच्यापुढे निवडणूक लढविण्याविषयी पेच उभा राहिला आहे. मुळात पूजा मोरे या पंडित आणि पवार यांना सक्षम पर्याय म्हणून पुढे आलेले नेतृत्व आहे
आणि आता राजकीय तडजोडीत त्यांना पंडितांचे काम करावे लागेल की काय अशी शंका त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे पूजाताई मोरे प्रस्थापितांना अपक्ष मैदानात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.