4.3 C
New York
Thursday, April 17, 2025

Buy now

spot_img

*राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास ‘भूतो न भविष्यती’ प्रतिसाद*

 

*अधिक शेतकऱ्यांना लाभ घेता यावा यासाठी एक दिवसाची मुदतवाढ*

बीड , दि. 24 ( जिमाका ): – परळी वैजनाथ येथील कृषी महोत्सवास शेतकऱ्यांचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला असून भूतो न भविष्यती गर्दी या ठिकाणी होताना दिसत आहे अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ घेता यावा यासाठी एक दिवस अवधी वाढवून सोमवार 26 ऑगस्ट पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.

स्व. पंडितअण्णा मुंडे सभामंडप, कृषी उत्पन्न बाजार समिती, परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात आलेल्या या कृषी महोत्सवास मुदतवाढ देण्याचे घोषणा प्रकल्प संचालक आत्मा सुभाष साळवे यांनी एका प्रसिद्धी पत्राद्वारे आज केली आहे.

राज्याचे कृषिमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व प्रमुख मार्गदर्शनाखाली महोत्सव परळी वैजनाथ येथे होत आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या प्रदर्शनासोबत पशुप्रदर्शनाची वेगळेपणाने आयोजन करण्यात आले आहे.

राज्यस्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन 21 ऑगस्ट रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व देशाचे कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेले आहे यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही उपस्थिती होती.
कृषी महोत्सवास आज सलग चौथ्या दिवशी पावसाळी वातावरण असून देखील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला व प्रदर्शन बघण्यास व माहिती घेण्यास मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती प्रदर्शनास बाहेरील जिल्ह्यांमधून देखील शेतकरी भेट देत आहेत. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम येथील शेतकरी गटांनी या ठिकाणी भेट देऊन प्रदर्शनातील साहित्याची पाहणी व नवीन तंत्रांची माहिती घेतली.

हे कृषी महोत्सवाचा प्रदर्शन सर्वांसाठीच लक्षवेधी ठरताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक शेतकरी बांधव त्या कृषी महोत्सवाला भेट देत असून दररोजच कृषी प्रदर्शनी बघण्यासाठी शेतकरी व नागरिकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. या ठिकाणी शेतीविषयक विविध प्रकारचे स्टॉल व त्याद्वारे शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान असो नवनवीन अवजारे नवनवीन उत्पादने यांची माहिती दिली जात आहे. त्याचबरोबर शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या सर्व योजनांची ही माहिती या कृषी महोत्सवातून देण्यात येत आहे कृषीविषयक तज्ञांचे मार्गदर्शनही या कृषी महोत्सवात होत आहे या कृषी प्रदर्शनाच्या अनुषंगाने या ठिकाणी भव्यदिव्य अशा प्रकारचे पशुप्रदर्शनही भरल्याचे दिसत आहे या पशुप्रदर्शनाला अनेक शेतकरी भेट देत असून विविध प्रकारचे पशु या प्रदर्शनात दिसून येत आहेत यामध्ये विविध जातींचे घोडे, बैल, म्हशी, कोंबडे आदी विविध पशु या प्रदर्शनात सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

*यशस्वी व्यवस्थापन*
भव्य अशा या महोत्सवाचे आयोजन कृषी विभाग व जिल्हा प्रशासनाने अतिशय उत्तम रित्या केलेले आहे येणाऱ्या शेतकऱ्यांच्या सर्व गरजा लक्षात घेऊन या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. येणाऱ्या शेतकऱ्यांना माफक दरात जेवण मिळावे यासाठी येथील फूड कोर्ट भागात दहा रुपयात शिव भोजन देण्याची देखील स्वतंत्र व्यवस्था आहे.

या व्यतिरिक्त महिला बचत गटांनी या ठिकाणी 24 स्टॉलच्या माध्यमातून विविध खाद्य पदार्थांची उपलब्धता भेट देणाऱ्या व्यक्तींसाठी ठेवलेली आहे. या सोबतच महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन देखील याच ठिकाणी लावण्यात आले असून या प्रदर्शनातून मोठ्या प्रमाणावर स्थानिक वस्तूंची विक्री होताना दिसत आहे.

यालगतच शेतकऱ्यांनी आपल्या द्वारे उत्पादित तीळ व इतर प्रकारच्या डाळी यांचे देखील स्टॉल या ठिकाणी लावले आहेत या ठिकाणी देखील नागरिक मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत खात्रीलायक थेट शेतातून उत्पादित उत्पादन आपल्या घरात येणार आहे याचा आनंद सर्व नागरिकांना आहे माफक दरात सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले धान्य या निमित्ताने शेतकऱ्यांना उपलब्ध झालेले आहे.

दिनांक 26 ऑगस्ट रोजी चौथा श्रावणी सोमवार असून परळी येथील ज्योतिर्लिंग वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर येत आहेत हे लक्षात घेऊन या प्रदर्शनास एक दिवस मुदत वाढवून देण्यात आलेली आहे.

जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी कृषी महोत्सवास भेट देऊन नवनवीन तंत्रज्ञान कृषी अवजारे तसेच कृषी विद्यापीठातर्फे विकसित तंत्रज्ञान व तज्ञांचे मार्गदर्शन याचा लाभ घ्यावा असे आवाहन विभागीय कृषी संचालक टी एस मोठे तसेच प्रकल्प संचालक आत्मा सुभाष साळवे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

ads

Related Articles

ताज्या बातम्या